नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच विदर्भात थंडीच्या लाटेची स्थिती
बुलेटिन वेब डेस्क
रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८ अंश सेल्सिअसने घट होऊन चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी या ठिकाणी राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील इतर ठिकाणीही तापमानातील घट कायम आहे. मराठवाडय़ातील परभणी व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील बहुतांश भागातील पारा घसरला आहे. चंद्रपूरमध्ये सलग चौथ्या दिवशी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भामध्ये अकोला (१३.२), अमरावती (१३.३) या भागांतील किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी कमी झाले आहे.
नागपूर (१३.४), वर्धा (१३.४) या भागातही रात्रीचा गारवा आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक (१२.६), जळगाव (१३.०) येथेही तापमानातील घट कायम आहे.
मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर वगळता इतर सर्वत्र किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात खाली आहे.
मराठवाडय़ातील परभणीमध्ये (१२.०) तीन दिवसांपासून तापमानात मोठी घट दिसून येत असून, औरंगाबाद, नांदेडमध्येही तापमानात घट झाली आहे.