वुई कॅन बी हिरोज' या हॉलिवूडपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर 'वुई कॅन बी हिरोज' या हॉलिवूडपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटात प्रियांका नकारात्मक भूमिकेत दिसेल.
चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना प्रियांकाने लिहिलंय, ख्रिसमसच्या दिवशी वेगळी पॉवर येतेय. या अद्भुत मुलांजवळ गुप्त अस्त्र आहे - टीम वर्प. त्यामुळेच सेटवर वेगळी ऊर्जा निर्माण होते.
तीच या चित्रपटाची जान आहे. म्हणूनच तुम्ही सांताची वाट बघत असताना, या भन्नाट मुलांकडेही बघा…
प्रियांकाचा 'वुई कॅन बी हिरोज' हा चित्रपट सुपरहिरो संकल्पनेवर आधारित आहे. यातील 'सुपरहिरो' मुले त्यांच्यावर एलियन्सने हल्ला केल्यानंतर आपल्या आईवडिलांना आणि जगाला कसे वाचवतात, हे दाखवले आहे.
हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. 'बेवॉच' हा प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा होता. त्यामध्ये तिने खलनायिका साकारली होती.
आता 'वुई कॅन बी हिरोज' या आगामी चित्रपटातही ती खलनायिका रंगवताना दिसेल.