भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे पनिशमेंट नव्हे - पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे
लक्ष्यवेध पुस्तकाचे ऑनलाइन विमोचन
अशोक कोरडे मारेगाव- अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना पनिशमेंट वाटत असते, मात्र अशा दुर्गम भागात राहून सुद्धा आपला वेळ सत्कारणी लावल्या जाऊ शकतो, असे मत महान समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी भामरागड येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले स्तंभलेखक व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संतोष डाखरे यांच्या लक्ष्यवेध नामक पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी व्यक्त केले. डॉ. डाखरे हे तालुक्यातील मांगरूळ येथिल रहिवासी असुन मागील 12 वर्षांपासून ते भामरागड येथे कार्यरत आहे.
आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्यात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्याहस्ते प्रस्तुत पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कोरोना कालावधीतिल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारे हे पुस्तक वाचनीय असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसह सर्वच स्तरातील अभ्यासकांना ते उपयुक्त सिध्द होईल, असेही ते पुढे म्हणाले.
राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या विदर्भप्रांत अध्यक्षा डॉ.अलका देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, डॉ. कमल सैनी (राजस्थान), डॉ. विवेककुमार हिंद (बिहार), डॉ. संपदा कुल्लरवार, पुस्तकाचे लेखक डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते. पुस्तकाचे समिक्षण डॉ. संदीप तुंडूरवार, संचालन डॉ. मंगेश आचार्य तर आभार डॉ. रवी धारपवार यांनी मानलेत. या सोहळ्याला महाराष्ट्रासह राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता.