उद्या मारेगाव ते भालेवाडी रोडवर कांग्रेस चे
रस्त्यासाठी अर्धनग्न आंदोलन व चक्काजाम
रस्त्यांची दुर्दशा, प्रशासनाचे दुर्लक्ष
ता प्र मारेगाव : तालुक्यातील प्रमुख रस्ते खड्ड्यांनी भरले असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दि. २६ जुलै रोजी तहसीलदार, पोलीस स्टेशन व विभागीय बांधकाम अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसने २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर, मारेगाव ते भालेवाडी रोडवर अर्धनग्न आंदोलन व चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट असून, शासनाकडून आलेला निधी नेमका कुठे गेला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. बांधकाम विभागाच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कोणताही राजकीय दबाव नाही की काय, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
या आंदोलनाचा पुढाकार तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार यांनी घेतला असून, त्यांच्या सोबत युवक काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक आकाश बदकी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश माफुर उपस्थित होते.
काँग्रेसने स्पष्ट केले की, जर प्रशासनाने तात्काळ रस्त्यांचे डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरु केले नाही, तर तीव्र आंदोलन करून बांधकाम विभागाचा ‘अकार्यक्षम चेहरा’ जनतेसमोर उघड केला जाईल.