चिंचाळा येथे एक गाव एक गणपती संकल्प यशस्वी मनोरंजनाऐवजी परिवर्तनाचा संदेश
ता प्र मारेगाव:-
चिंचाळा येथे श्री बाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव मनोरंजनासाठी नाही तर समाजपरिवर्तनासाठी या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील आणि संत-महापुरुषांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव येथे उत्साहात पार पडला. या उत्सवात डीजे न लावणे, नशा न करणे आणि फक्त भावगीत व भक्तिगीतेच वाजवणे अशा तीन महत्त्वाच्या निर्णयांवर सर्वांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.
दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात भजन संध्या, अभंगवाणी, जाहीर कीर्तन, श्री हरिपाठ, व्याख्यान, प्रबोधन यांसह गावातील बालगोपाल, स्त्री‑पुरुष यांच्यासाठी खेळांचे कार्यक्रमही घेण्यात आले. शेवटच्या दिवशी खेळांतील विजेत्यांचा सत्कार करून त्यांना श्री हनुमान चालीसा आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
उत्सवाच्या अंतिम दिवशी ‘आत्मनिर्भर ग्राम’ ही संकल्पना सर्वांसमोर ठेवून गावातीलच श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री गुरुदेव स्वर साधना भजन मंडळ आणि श्री हनुमान पदावली भजन मंडळ यांच्या पुढाकाराने श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पालखी काढण्यात आली. भजनाच्या गजरात गणपतीचे विसर्जन करून उत्सवाची सांगता झाली.
या उपक्रमामुळे गावात एकतेचा आणि सकारात्मक बदलाचा संदेश पोहोचला असून ‘एक गाव – एक गणपती’ ही संकल्पना यशस्वी ठरली.