रिल्स स्टार ‘साधा माणूस’ कडून वृद्धाश्रमात अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
समाजासाठी दिला संवेदनशील संदेश
ता प्र मारेगाव :- समाजमाध्यमांवर ‘साधा माणूस’ या नावाने लोकप्रिय असलेले आणि लाखो लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे मारेगाव येथील विलास झट्टे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. त्यांनी वणी तालुक्यातील श्री बालाजी महाराज वृद्धाश्रम, पळसोनी येथे भेट देत वृद्धांमध्ये आनंद वाटत वाढदिवस साजरा केला.
यावेळी झट्टे यांनी वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना शाल खजूर
आणी फळाचे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले. वृद्ध व्यक्तींशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि काही क्षण त्यांच्यासोबत घालवले. त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार झालं.
विलास झट्टे यांनी सांगितले की, “वाढदिवस केवळ केक कापून साजरा करण्याऐवजी जर त्या दिवशी कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं, तर त्याचा खरा आनंद मिळतो. आपण जे प्रेम सोशल मीडियावरून मिळवत आहोत, त्याचे उत्तर समाजासाठी काहीतरी चांगले करून द्यावे हीच भावना मनात होती.”
विलास झट्टे यांचे कौतुक सामाजिक जाणीव ठेवत वाढदिवस साजरा केल्याबद्दल झट्टे यांचे अनेकांनी अभिनंदन केले. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
सामाजिक कार्यासाठी डिजिटल लोकप्रियतेचा उपयोग करून समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न खरंच प्रेरणादायी आहे. 'साधा माणूस' या नावाने लाखो हृदय जिंकणाऱ्या झट्टे यांनी खऱ्या अर्थाने आपली लोकप्रियता एका चांगल्या कार्यासाठी वापरून दाखवली आहे.