मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ता. प्र. मारेगाव :
मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय 57) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (23 ऑगस्ट) सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलिस दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उमेश बेसरकर यांची बदली पुसद येथून मारेगाव पोलिस स्टेशनला 14 जून 2025 रोजी झाली होती. त्यांनी नुकतेच पोलिस निरीक्षक म्हणून येथे रुजू होऊन आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या मनात स्थान मिळवले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमीच तत्पर असल्याने त्यांचा अधिकारी व नागरीकांमध्ये विशेष सन्मान होता.
आज सकाळी सुमारे 10.30 वाजता दरम्यान त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चिकित्सकांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनामुळे मारेगावसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काल (ता.२२) मारेगाव पोलिसांनी पोळा सणानिमित्त शहरात काटेकोर बंदोबस्त ठेवत शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले. सण शांततेत व सुरक्षिततेत पार पाडावा यासाठी पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक व गावभागात पोलीसांची तैनाती करून उत्तम व्यवस्था केली.नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, कोणताही अनुचित प्रकार न घडता सण आनंदात पार पडला.आणि अचानक आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.