मनसेकडून गरब्याचे आयोजन; १० सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात
वणी /प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी येथे यंदाही भव्य दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी इच्छुक महिलांना १० सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत, दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत वरोरा रोडवरील महावीर भवन येथे दांडिया आणि गरबा नृत्याचा सराव करण्याची संधी मिळणार आहे.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकाराने वणीतील प्रा. राम शेवाळकर परिसरात हा दांडिया गरबा आयोजित करण्यात येतो. विशेष म्हणजे, या सरावात सहभागी होणाऱ्या महिलांना मुख्य स्पर्धेत प्रवेशासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नसेल.
हा गरबा महोत्सव केवळ नृत्याची मेजवानी नसून, यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. आजवर दुचाकी, लॅपटॉप, सोन्याचे दागिने आणि मोबाईल अशा अनेक मौल्यवान वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्पर्धेत शेकडोच्या संख्येने स्पर्धक सहभागी होतात.
या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार इथे हजेरी लावतात. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील कलाकार, 'बानू' फेम ईशा केसकर, प्राजक्ता माळी आणि सोनाली कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांनी याआधी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.
या वर्षीच्या गरबा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या सरावात शहरातील सर्व इच्छुक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वैभव पुराणकर (+91 97653 60095) किंवा जतिन राऊत (+91 95953 69557) यांच्याशी संपर्क साधावा.