रखरखत्या उन्हामध्ये तहानलेल्या पक्ष्यांना तुम्हीही द्या... चारा, पाणी..!
अशोक कोरडे मारेगाव
संपूर्ण जिल्ह्यात उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असताना पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल? अन्न पाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. त्यांच्यासाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळे अनेक पक्ष्यांना जीवदान मिळणार आहे. पक्षी प्रेमी, निसर्गावर प्रेम करणारे काही संवेदनशील नागरिक पक्ष्यांच्या दाना पाण्यासाठी धडपडत आहेतच, परंतु त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी इतर नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत तालुक्यातील अती दुर्गम आदिवासी बहुल भागात काम करणाऱ्या निड संस्थेच्या रजनी आत्राम, मंजुषा गोवरदिपे,सुनील गोवरदीपें, गंगाधर आत्राम, मारेगाव येथील ऍड.मेहमूद पठाण या पक्षी प्रेमींनी केले आहे.
दरवर्षी जंगलात शेतशिवरात मार्गावरील, जिथे झाडे झुडपे आहे अश्या ठिकाणी शक्य होईल तेवढ्या प्रमाणात पक्ष्यांसाठी दाण्या पाण्याची व्यवस्था निड संस्थेद्वारे तसेच ऍड मेहमूद पठाण यांचे तर्फे अविरत सुरू आहे. सूर्य आग ओकत आहे. अश्यावेळी मारेगाव कोर्टातही चिऊसाठी वीस , पंचवीस ठिकाणी दानापाण्याची व्यवस्था केली आहे. या करिता न्यायालयाचे लघुलेखक आर. आर. हरदिया हे खर्च करतात.
उन्हाची दाहकता वाढल्याने पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पक्षाच्या सोईसाठी घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात थंड पाणी ठेवावे. पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा
करून ठेवता येईल, पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा योग्य वापर करून सोय करता येईल, पंधरा, वीस वर्षापूर्वी गावखेड्यांमध्ये अनेक गावकऱ्यांच्या घराबाहेर पक्ष्यासाठी दाना पाणी ठेवलेले असायचे.तसेच साफसफाई करून शिल्लक राहिलेले अन्न धान्य अंगणात टाकल्यानंतर चिमण्या, चिवचिव करीत अंगणात दाने टिपायला यायचे. पक्ष्यांना ते खायला मिळायचे. मात्र आज शहरातील बंदिस्त घरात हे शक्य होत नाही. परंतु घराच्या गच्ची किंवा खिडक्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी तसेच अन्न ठेवल्यास पक्ष्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. घरातच नाही तर आपल्या फिरण्याच्या जागे जवळ, झाडांवर, झाडाखाली, अन्नपाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. तुम्ही कामानिमित्त जिथे जिथे जाता तिथे हे करणे शक्य आहे. असे छोटे छोटे प्रयत्न अन्न पाण्यासाठी तडफडणाऱ्या पक्ष्यांचे जीव वाचवू शकतात. यासाठी हजारो हात पुढे येण्याची आज गरज आहे.
गेल्या आठवड्या पासून तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना पक्षांनाही उन्हेचा मोठा फटाका बसत आहे. त्यांच्या साठी मारेगांव येथील न्यालायात न्यायाधीश के. पी. दवणे यांच्या संकल्पनेतून कोर्टाच्या हिरव्यागार परिसरातील पक्ष्यांना तब्बल पॅंचेवीस ठिकाणी दाण्यापण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील पक्ष्यांना त्याचा लाभ मिळत आहे.